युवा अभिसरण मोहीम हा एक राज्यांतर्गत युथ एक्सचेंज प्रोग्राम आहे. आज राज्यभरात सर्व ठिकाणी महाराष्ट्र अस्मिता, मराठी अस्मिता याबाबत चर्चा सुरु असताना अस्मिता म्हणजे नेमके काय? ती कशा पद्धतीने जोपासावी? या संदर्भातील विचारांमध्ये आजच्या युवांमध्ये संभ्रम दिसून येतो. त्यामुळे आज राज्यातील युवा महाराष्ट्राची आणि मराठी अस्मिता प्रकट करण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबत आहेत. या काळामध्ये त्यांना महाराष्ट्राची अस्मिता विधायक रीतीने समजून या युवांना महाराष्ट्राचे प्रांतिकदृष्ट्या सामाजिक दर्शन घडवून आणणे गरजेचे आहे. जोपर्यंत आजचा युवा विविध अंगांनी महाराष्ट्र समजून घेणार नाही, महाराष्ट्रातील विविध भाग फिरून त्या संदर्भातील आकलन करणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील युवांना राज्याची अस्मिता किंवा मराठी अस्मिता कळली, असे म्हणता येणार नाही. म्हणून नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे अभियानाच्या निमंत्रक सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून युवा अभिसरण मोहीम आयोजित करण्यात येते. | |