Process
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत असताना राज्याचे युवा धोरण जाहीर झालेले नव्हते. यास्तव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा उपक्रम निमंत्रक मा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतला आहे. मसुदा निश्चितीच्या प्रक्रियेसाठी अभियानातर्फे ड्राफ्ट कोअर टीमची स्थापना करण्यात आली. तसेच विविध विषयांसंदर्भात तज्ज्ञ मंडळींची ड्राफ्टिंग कमिटीही गठित करण्यात आली. या समितीमध्ये महाराष्ट्रातील तीस नामवंत विचारवंत, अभ्यासक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.
या अंतर्गत दि. १२ जून २००९ रोजी मुंबई येथे युवा धोरण माहिती परिषद आयोजित करून युवांमध्ये युवा धोरणासंदर्भात जागृती आणि राज्य शासनास युवा धोरणाची जाहीर करण्याची गरज याकडे लक्ष वेधण्यात आले. याच दिवशी विधान भवनात मा.ना. अशोक चव्हाण (तत्कालीन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.ना. छगन भुजबळ (तत्कालीन मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. मंत्री व मा. राज्यमंत्री (तत्कालीन क्रीडा व युवक कल्याण खाते, महाराष्ट्र राज्य) यांना शिष्टमंडळाने भेटून राज्य शासनाने युवा धोरण जाहीर करावे, या संदर्भातील निवेदन सादर केल.
प्राथमिक मसुदा तयार करण्याकरिता सुमारे २५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यशाळा, युवा परिषदांचे आयोजन करून युवांना व जाणकारांना या प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे तयार करण्यात आलेला युवा धोरणाचा प्राथमिक मसुदा दि. ८ ऑगस्ट २००९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. ना. छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री मा. ना. सतीश पाटील यांना आणि दि. ९ ऑगस्ट २००९ रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. अशोक चव्हाण यांना सादर करण्यात आला.
प्राथमिक मसुदा तयार झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व सूचना मिळण्याकरिता पुनश्च एकदा राज्य पातळीवर २० जिल्ह्यांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. राज्य पातळीवर या मसुद्यावर विचारमंथन घडून यावे, यासाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या ब्लॉगवर तो सर्वांसाठी खुला करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याला युवा धोरण लवकरात लवकर जाहीर व्हावे, या संदर्भात सांसदीय पातळीवर सर्वपक्षीय मतैक्य घडवून आणण्याकरिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या शिष्टमंडळाने हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात दि. १६ ते १८ डिसेंबर २००९ रोजी सुमारे १०० मंत्रीमहोदय व सर्वपक्षीय आमदारांच्या भेटी घेतल्या. या सर्व प्रक्रियेत राज्यभरातून प्राप्त झालेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अंतरिम मसुदा दि. ३० डिसेंबर २००९ रोजी तयार करण्यात आला.
युवा धोरणाचा अंतिम मसुदा राष्ट्रीय युवा दिनी म्हणजेच दि. १२ जानेवारी २०१० रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे एका विशेष समारंभात अभियानाच्या निमंत्रक मा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. अशोक चव्हाण, तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. ना. छगन भुजबळ, तत्कालीन क्रीडा व युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री मा. ना. भास्कर जाधव, सचिव मा. संजय कुमार यांना सादर करण्यात आला.
दि. २० फेब्रुवारी २०१० रोजी शासनाकडून युवा धोरण जाहीर करण्यासाठी शासकीय समिती गठित करण्यात आली. यात विविध विषयवार उपसमित्या गठित करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील शंभर युवक-युवतींची समिती या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असून, राज्यातील युवा विकासासंदर्भात कार्य करणार्या पंचवीस संस्था, संघटनादेखील या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत.








