YOU ARE HERE: Home आमच्याविषयी इतिहास

इतिहास

ई-मेलप्रिंटपीडीएफ़
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली २५ वर्षे महाराष्ट्राच्या समाजकारणात भरीव व मोलाचे कार्य करीत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचे ध्येय प्रतिष्ठानने अंगी बाळगले आहे. याच भूमिकेतून प्रतिष्ठानचा विस्तार केंद्रीय कृषिमंत्री मा.ना.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील ८ विभागीय केंद्रांमध्ये झालेला आहे. प्रतिष्ठानचे विविध विभाग महाराष्ट्रात कार्यान्वित असून त्यामध्ये नवमहाराष्ट्र युवा अभियान, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, कृषी व सहकार व्यासपीठ, कायदेविषयक सल्ला फोरम, यशस्विनी अभियान, अपंग हक्क व विकास मंच, शिक्षण विकास मंच असे विभाग आहेत.

नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे पूर्वाश्रमीचे नाव `नवभारत युवा आंदोलन' असे होते. त्याची स्थापना १९८९ साली करण्यात आली. अभियानाचे संस्थापक सदस्य म्हणून मा.प्रेमानंद रूपवते, मा.जयंत पाटील, मा.दिलीप वळसे पाटील, मा.क्रांती शहा, मा.मदन भोसले, मा.अ‍ॅड.दीपक पाटील, मा.कुलदीप गावंडे, मा.प्रकाश चव्हाण, मा.दिलीप शिंदे यांचा समावेश होता. अभियानातर्फे गेल्या २० वर्षांमध्ये अनेक उपक्रम राबविले गेले. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य युवा धोरण जाहीरनामा उपक्रम, अभिसरण (Intrastate Youth Exchange Program), व्हिजन करिअर फेअर व व्याख्यानमाला, यशवंतराव चव्हाण राज्य युवा पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य युवा क्रीडा पुरस्कार, यशवंत युवा फेलोशिप, विद्यार्थी युवा साहित्य संमेलन, युवा स्वातंत्र्यज्योत रॅली (१४ ऑगस्ट मध्यरात्री), सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग, पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना समन्वय उपक्रम, युवती महोत्सव व किशोरी शिबिरे, पिनॅकल क्लबसोबत साहसी उपक्रम, महाविद्यालयीन अनियतकालिक पारितोषिक योजना असे विविध उपक्रम अभियानातर्फे राबविले जातात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यभरात १० विभागीय केंद्रे कार्यान्वित आहेत.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील पुरोगामी महाराष्ट्रातील संस्कारक्षम युवांची अफाट अशी ऊर्जा व ध्येयनिष्ठा जोपासत राज्याला समर्थ व समृद्ध करण्यासाठी युवा चैतन्य निर्माण केले पाहिजे. सामाजिक न्याय व एकात्मता या मूल्यांवर आधारित समाजरचनेचा आग्रह त्यांच्या मनात रुजविला पाहिजे. साहित्य, संस्कृती, कला या माध्यमातून व्यक्त होणार्‍या युवा पिढीची सांस्कृतिक चळवळ समृद्ध केली पाहिजे, हे नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे ब्रिद आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये बदलत्या काळामध्ये तरुणांसमोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत. जाती धर्माच्या नावावर हिंसा, सामाजिक विषमतेचे समर्थन, चंगळवाद, लैंगिक गैरसमजुती व अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि अंधश्रद्धा आदी समस्यांना भिडणार्‍या कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रामध्ये उभी रहावी, हे अभियानाचे ध्येय आहे. संवेदनशील तरुणांना विधायक व सकारात्मक कामाला प्रवृत्त करणे, यासाठी अभियान कार्यरत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक भूमिकेतून काम करणार्‍या तरुण कार्यकत्र्यांचे समन्वय-संघटन व त्यांना प्रशिक्षण-मार्गदर्शन करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.