आर.आर. पाटील यांचे मत, 'जागर जाणिवांचा तुमच्या आमच्या लेकींचा' पदयात्रेस प्रारंभ
शिरवळ (जि.सातारा) - 'प्रत्येकाला आई पाहिजे,पत्नी पाहिजे,बहीण पाहिजे, मात्र मुलगी नको ही मानसिकता समाजाचे स्वास्थ बिघडून टाकेल, अशी भीती व्यक्त करतानाच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लोकजागृती आणि लोकशिक्षण हेच प्रभावी साधन असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज (गुरुवारी) येथे केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्त्री-भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी "जागर जाणिवांचा, तुमच्या आमच्या लेकींचा ' पदयात्रेचा प्रारंभ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांवात आज झाला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत आर.आर.पाटील बोलत होते. ते म्हणाले,"" आज जन्माला येण्याचा मुलींचा हक्कच नाकारला जात आहे. त्यामुळे स्त्री पुरुष यांचे प्रमाण ढासळले आहे. मुलगी नको ही मानसिकता भविष्यात समाजाचे स्वास्थ बिघडून टाकेल. त्यामुळे सामाजिक स्वास्थ टिकेल का नाही अशी आपणास भीती वाटते. सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान समाजाचा अधःपात करेल की काय ? अशी शंका येते. जे डॉक्टर तयार करण्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये खर्च केले, तेच डॉक्टर आज कसायाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे जाणीव जागृतीची समाजात गरज आहे. केवळ कायदा करून उपयोग होणार नाही. लोकजागृती व लोकशिक्षण हेच प्रभावी साधन ठरेल.''
सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आर.आर.पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून नायगाव ते पुणे या स्त्री-भ्रूणहत्याविरोधातील जागृती पदयात्रेला प्रारंभ झाला.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, खासदार लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील, अरुण गुजराथी,.सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, शुभांगी पवार प्रतिष्ठानचे कोशाध्यक्ष हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले, 'सावित्रीबाईंच्या जन्मभूमीत येऊन त्यांना अभिवादन करताच एक मोठी ऊर्जा मिळत असते. हे गाव एक ऊर्जा केंद्र आहे. हे "नायगाव' नाही तर महिलांना खऱ्या अर्थाने न्याय देणारे गाव म्हणून हे 'न्याय गाव' आहे. शिक्षणाच्या जोरावर महिलांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केली. देशाच्या सर्वोच्च असा राष्ट्रपतीपदाच्या स्थानावर एक महिला जाऊन पोचली, ही महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची फलश्रुती आहे.''
जयंत पाटील म्हणाले, 'राज्यातील गेले दहा पंधरा वर्षातील स्त्री पुरुषांचे प्रमाण व आजची परिस्थिती पाहता चिंताजनक परिस्थिती आहे. राज्यात प्रगती झाली, सुबत्ता आली तेथे मुलींची संख्या कमी आहे. ज्या भागात मागासलेपणा आहे. तेथे स्त्री पुरुषाचे प्रमाण समाधानकारक आहे. हा असमतोल दुरुस्त करण्याची पताका सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. ही आनंदाची बाब आहे. त्याची सुरवात आज सावित्रीबाईंच्या नायगावमधून होत आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला संदेश देण्याचे काम या पदयात्रेने होणार आहे. राज्यातील स्त्रीला सबल करण्याचे काम शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना 1993 मध्ये प्रथम केले. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज हाच संदेश संपूर्ण देशाने स्वीकारला आहे. स्त्री पुरुषांची समानता आवश्यक आहे.''
स्त्री- भ्रूण हत्या विरोधी जनजागृती पदयात्रेमागील भूमिका विशद करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ""पुणे जिल्ह्यातील एक हजार मुलांमागे मुलींच्या प्रमाणात गेल्या दहा वर्षात मोठी घसरण झाली. स्त्रीभ्रूण हत्येच्या काही घटना मनाला वेदना देऊन गेल्या. त्यातूनच मुला- मुलींचा समतोल सांभाळण्यासाठी काही केले पाहिजे याची जाणीव झाली. हा सामाजिक प्रश्न असल्याने केवळ कागदोपत्री नियम करून काही होणार नाह . हा प्रश्न घेऊन लोकांच्या मनाला साद घातली तर आगामी काळात निश्चित समाधानकारक चित्र दिसेल असा आत्मविश्वास वाटतो. त्यासाठी "जागर जाणिवांचा...' हा पाच वर्षांचा व्यापक कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.''
त्या पुढे म्हणाल्या 'आजच्या पदयात्रेला आलेल्या युवतीशी मी बोलले. त्या मुलगी किंवा मुलगी असा भेदभाव करणार नाहीत. मुलींच्या जन्माचे सर्वजण स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. मुलगा किंवा मुलगी एक किंवा दोनच अपत्य असू द्या. थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या,''असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी मधुकरराव पिचड, ऍड. वर्षा देशपांडे यांची भाषणे झाली. प्रारंभी नायगावचे सरपंच राजेंद्र नेवसे यांनी स्वागत केले. आमदार मकरंद पाटील यांनी प्रास्ताविक तर शशिकांत शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास राजमाता कल्पनाराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, अशोक पवार, विलास लांडे, अनिल भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार उदय सामंत, विद्या चव्हाण, पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एम. जे. पवार, सुरेखा ठाकरे, पद्मिनी सोमाणी, डॉ. समीर दलवाई, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके, पंचायत समितीचे सभापती विनोद क्षीरसागर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष विलासराव वाठारकर, बकाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, पदयात्रा प्रारंभाच्या कार्यक्रमास राज्यभरातून सुमारे एक हजार विद्यार्थिनी आल्या होत्या. या विद्यार्थिनींसह मान्यवरांच्या स्वागतासाठी नायगाव ग्रामस्थांनी रस्त्याकडेने रांगोळ्या काढल्या होत्या. या सोहळ्याला सातारा, पुणे, मुंबई, सांगली आदी जिल्ह्यातून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती.
पवार घराण्यात जन्म झाल्याचा अभिमान - सुळे
स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्याने त्यांना बळ मिळाले आहे. आत्ता विधानसभा आणि लोकसभेतही 50 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी होत आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे असे स्पष्ट करून सुप्रिया सुळे म्हणाल्या,"" पवार घराण्यात जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो. एका मुलीनंतर माझ्या वडिलांनी ऑपरेशन केले''








